सातारा येथे करंजी येथील उपक्रमशील शिक्षक संदीप चव्हाण यांचा मा. खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते सन्मान
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ९ मे रोजी असलेल्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त झाला सत्कार
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ९ मे रोजी असलेल्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त कर्मवीर समाधी परिसर, सातारा येथे आयोजित कार्यक्रमात मा. खासदार शरदराव पवार, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त रयत शिक्षण संस्थेच्या करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील उपशिक्षक संदीप दिलीप चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
चव्हाण यांनी आपल्या नोकरीच्या कालावधीत राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून उपलब्ध करून दिलेल्या सुविधा लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी पुढाकार घेऊन विद्यालय व परिसरातील साधारणता १६ शाळांसाठी शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र सुरू केले. सव्वा किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी आणून पिण्याच्या पाण्याची सुविधा विद्यालयात निर्माण केली. राहाता येथील भनसाळी मोटर्स चे राजेंद्र भनसाळी या देणगीदाराकडून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चाचे स्वच्छतागृह उभारले. लोकसहभागातून चार वर्ग खोल्या इस्टिमेट दरापेक्षा कमी खर्चात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण केल्यात. तसेच राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणून योगदान दिले. इयत्ता नववी व दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम तयार करताना राज्यस्तरीय तज्ञ म्हणून काम केले. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सिंगापूर येथे करून शालेय शिक्षण विभागास त्याचा अहवाल सादर केला.
संदीप चव्हाण यांना यापूर्वी विविध क्षेत्रातील नामांकित पुरस्कार प्राप्त झालेले असून त्यांची तीन विश्वविक्रमात नोंद झालेली आहे. तसेच शालेय गुणवत्तेमध्ये केंद्र शासनाचा उपक्रम असलेला इन्स्पायर अवार्ड या वैज्ञानिक स्पर्धेत, करंजी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या साह्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे झालेल्या ९ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात केले. ही इन्स्पायर अवॉर्ड साठी झालेली निवड संपूर्ण रयत शिक्षण संस्थेमध्ये एकमेव होती. अशा विविध शैक्षणिक व सामाजिक कार्याचा एकूण सारासार विचार करून हा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च असणारा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार चव्हाण यांना प्राप्त झाला आहे.
सातारा येथील झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सौ मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संस्थेचे सचिव महादेव शिवणकर सहसचिव माध्यमिक साळुंके, उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के, समन्वय समिती व जनरल बॉडी चे सदस्य कारभारी पा.आगवन जनरल बॉडी सदस्य एम.टी .रोहमारे, जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, रयत शिक्षण संस्थेचे सर्व मॅनेजिंग कौन्सिलचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व बहुसंख्येने रयत सेवक उपस्थित होते.
हा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी संदिप चव्हाण यांचे वडील दिलीप चव्हाण,आई सौ.कल्पना चव्हाण, पत्नी सौ.गौरी चव्हाण, मुलगा चि.शिवम चव्हाण, मुलगी कु.रेवती चव्हाण, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुनील पाठक, विद्यालयाचे मुख्या. दिनकर माळी, स्कूल कमिटीचे सांडूभाई पठाण, डॉ.सुनील देसाई ,विद्यालयातील सहकारी, व सर्व करंजी पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Add a Comment