रयत गुणवत्तेसाठी देशाबाहेरच्या संस्थांची मदत घेणार : मा. खासदार शरदरावजी पवार
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते.
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
सातारा : “आज जग वेगाने बदलत आहे, नवनवीन ज्ञानाची दालने खुली होत आहेत, त्यामुळे संस्थेने देखील नवीन युगाचे ज्ञान रयतेच्या विद्यार्थ्याला मिळावे म्हणून काही बदल स्वीकारले आहेत. त्यानुसार जगामध्ये असणारे नामांकित विद्यापीठ ऑक्सफर्ड तसेच आय.बी.एम. कंपनी यांच्याशी सामंजस्य करार करीत आहोत. आय.बी.एम. कंपनी १२० देशात काम करीत असून १०० टक्के नोकरी मिळण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट हि कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करते, तिचे सहकार्य घेऊन ज्ञान घेण्याची संधी आपल्याला मिळत आहे. जगातील महत्वाचे ज्ञानाचे भांडार व्हावे यासाठी रयत शिक्षण संस्था देशाबाहेरच्या संस्थांची मदत घेणार आहे, असे मत मा. खासदार शरदरावजी पवार यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६४ व्या पुण्यतिथी समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, आज रयत शिक्षण संस्थेच्या ७३७ शाखा असून त्यामध्ये ४ लाख ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यापैकी ५४ टक्के विद्यार्थी मागासवर्गीय असून ४६ टक्के अन्य आहेत. ४९ टक्के मुली संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे. सर्वांना सामावून घेण्याचे सूत्र संस्थेने सुरुवातीपासून बाळगले आहे. आज या शैक्षणिक वर्षांमध्ये अण्णांचे रयतचे विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न आकारास आलेले आहे, महाराष्ट्र शासनाने आपला प्रस्ताव मान्य केल्यामुळे या विद्यापीठाच्या कार्यवाहीस गतिमानता आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. रयत शिक्षण संस्थेने साक्षरतेपासून सुरुवात केली. परंतु जगासाठी ज्ञानाचे भांडार आणि त्या ज्ञानाचा उपयोग व मार्गदर्शन करण्याची शक्ती आपल्या मुलांमध्ये यावी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सेवक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात आज देशातील एक उच्च दर्जाची शिक्षण संस्था असल्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे. नवीन पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या गोष्टी रयतच्या विद्यार्थ्यास अवगत झाल्या पाहिजेत.
आज संस्थेचा इथपर्यंतचा प्रवासात अनेकांनी त्याग केला, खस्ता खाल्ल्या आणि त्यांच्या प्रचंड योगदानामुळेच संस्था या उंचीपर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामध्ये एन.डी.पाटील, गणपतराव देशमुख, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांनी सामाजिक बांधिलकी बाळगत पायाभूत काम केले. या सर्वांच्या विषयी आपणाला कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. संस्था वाढली, विस्तार झाला, बाराशे कोटीचे बजेट असून संस्थेचे व्यवस्थापन अधिक दर्जेदार कसे करता येईल, प्रशासन अधिक गतिमान कसे करता येईल, तसेच संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अखंड काम कसे करता येईल, यासाठी आपणाला काही निर्णय घ्यावे लागतील. त्यातून संस्थेचे हित आणि प्रतिष्ठा वाढेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद असायला हवे आहेत कारण संस्थेच्या वाढीमध्ये रयत सेवकांचे व कार्यकर्ते यांचे योगदान महत्त्वाचे आहे. असे ते म्हणाले.
प्रारंभी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्थेचे चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील म्हणाले की, “कोरोनानंतर संस्थेने कात टाकली. १९३९ साली कर्मवीरांनी ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न पाहिले होते, ते आज आकारास आले आहे, देशामध्ये असणाऱ्या ११ क्लस्टर युनिव्हर्सिटी पैकी रयत ही एक सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी असून यामध्ये ३२ यु.जी. २९ पी.जी. व ११ पी.एचडी. सह १०१ कौशल्य विकासाचे कोर्सेस राबवले जातात. संस्थेकडे स्वतःची रिसर्च इन्स्टिट्यूट असून संस्थेचे एक महाविद्यालय एन. आय. आर. एफ. च्या राष्ट्रीय मानांकनात पहिल्या १५० मध्ये आहे. संस्था ऑक्सफर्ड, आय.बी.एम.शी करार करत असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असणारे बदल रयत मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आलेले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार संस्थेमध्ये२८ हजार विद्यार्थी, ५२० कौशल्य विकासाचे कोर्सेस मध्ये सहभागी झालेले आहेत. जगाच्या शैक्षणिक विकासामध्ये एकूण पाच क्रांत्या होऊन गेल्या. वाफेच्या इंजिनाचा शोध, इलेक्ट्रिसिटी, संगणक, इंटरनेट नंतर पाचवी क्रांती ही कृत्रिम बुद्धिमत्तेची असेल आणि रयतचा विद्यार्थी यापासून वंचित राहू नये म्हणून संस्था जागतिक पातळीवरील नामांकित संस्थांशी सामंजस्य करार करत आहे. संस्थेच्या सर्व सहाशे शाखा ऑप्टिकल फायबरने जोडण्याचा मानस असून यापैकी अगदी शंभर शाखा जोडणे बाकी राहिलेले आहे. स्किल, रिस्कील, अप्स्कील यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या रयत शिक्षण पत्रिका व रयत विज्ञान पत्रिकांच्या अंकांचे प्रकाशन मा.खासदार शरदरावजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी मा.चंद्रकांत दळवी व कुलगुरू मा.डॉ. डी.टी. शिर्के, संस्थेचे थोर देणगीदार, विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी , गुणवंत शिक्षक, स्पर्धा परीक्षा वर्ग एक मध्ये निवड झालेले विद्यार्थी, नॅक मानांकित महाविद्यालयांचे प्राचार्य, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा यांचा सत्कार करण्यात आला. याचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मा. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव मा.राजेंद्र साळुंखे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंबर्स,लाइफ वर्कर्स, संस्थेच्या विविध शाखामधून आलेले प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. खासदार शरदरावजी पवार व मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांनी कर्मवीर समाधीस अभिवादन केले.
Add a Comment