महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुका निहाय दौऱ्याचे नियोजन : उत्कर्षा रुपवते
राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी सह्याद्री माझाशी बोलताना व्यक्त केला मनोदय
अकोले : महिलांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी गाव पातळी पासून काम सुरु करण्याचा मनोदय असून त्यासाठी सहकारी राज्य महिला आयोगाच्या सदस्या दिपिका चव्हाण यांच्यासह तालुका निहाय भेटी व दौऱ्याचे नियोजन करणार असून महिला सक्षम कशा होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मनोदय राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केला.
कोतूळ (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे एका कार्यक्रमानिमीत्त आल्या असता सह्याद्री माझा ने उत्कर्षा रुपवते यांच्याशी संवाद साधला असता. महिलांप्रती असलेली तळमळ आणि आगामी काळात महिलांसाठी काय करणार आहोत याची रुपरेषाच त्यांनी मांडली.
ग्रामिण भागातील मुली शाळा काॅलेजला जात असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. टारगट व्यक्ती, मुले यांच्याकडून त्यांना त्रास होत असतो. त्यामुळे अनेक मुली मधूनच शिक्षण सोडून देत असतात. असे न करता त्यांना न घाबरता अशा गोष्टींचा प्रतिकार केला पाहिजे. अशा व्यक्तिंची तक्रार तातडीने केली पाहिजे. त्यासाठी पालकांनीही आपल्या मुलीशी मोकळे पणाने बोलणे गरजेचे आहे.
महिलांचे कामाच्या ठिकाणीही लैंगिक शोषण होत असल्याचे पाहायला मिळते. मात्र महिला घाबरुन तक्रारी करण्यास पुढे येत नाहीत. हे चुकीचे असून त्यांनी अशा गोष्टींना धाडसाने विरोध केला पाहिजे. अशा महिलांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार असून बसस्थानक, काॅलेज या सारख्या ठिकाणी पिंक बाॅक्स बसविण्यात येणार असून अशा पिडीतेंनी त्यात आपली तक्रार त्यात करावी त्याची दखल घेऊन उचित कारवाई करण्यात येणार आहे.
महिलांसाठी नुसती भाषणबाजी न करता ठोस असे उपक्रम करणे गरजेचे आहे. शाळा, काॅलेज याठिकाणी चर्चासत्र घेऊन विविध कायद्यांबाबतची माहिती सर्वांपर्यत पोहोचली पाहिजे. पोलीसांची भूमिका याबाबत महत्वाची असून त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचे त्यांनी निवारण करणे गरजेचे आहे. बसस्थानकावर गस्त वाढविणे गरजेचे आहे. विनाकारण मुलींना त्रास देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त झाला की त्याचा धाक इतरांना वाटून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात होण्यात घट होईल.
मुलींना लहान पणापासूनच डेरिंगबाज बनविण्यासाठी प्रयत्न केले. पाहिजेत. पालकांनी आपल्या मुलामुलीं सोबत मित्रत्वाचे नाते ठेवले तर बाहेर वावरताना काही अडचण आल्यास ते घरी मनमोकळेपणे बोलू शकतील. घरातील वातावरण त्यासाठी मोकळे हवे. महिला आयोगाच्या वतीने काम करताना महिला समाजात भितीमुक्त वातावरणात कशा राहतील यासाठी आमच्या सर्व सदस्यांचा प्रयत्न राहिल. कोणाची काही तक्रार असेल तर १५५२०९ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Add a Comment