कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करणार – शंकरराव गडाख
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
मुंबई, दि. 20 : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल लघु पाटबंधारे योजनेमुळे येथील स्थानिकांना फायदा होणार आहे, त्यामुळे या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
आज मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर येथील मौजा कोतवाल प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जलसंधारणाचे अपर आयुक्त सुनिल कुशिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. गडाख म्हणाले, कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण करणे, स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देणे ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. याशिवाय या आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक असलेली सुधारीत प्रशासकीय मान्यता घेऊन निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मंत्री श्री. गडाख म्हणाले.
विरोधी पक्षनेते श्री. दरेकर म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून या योजनेचे काम सुरु असून हे काम यावर्षी पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित विभागाने कालबद्ध आराखडा तयार करुन काम करावे. योजनेअंतर्गत काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही आणि योजनेचे काम थांबणार नाहीत. याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.