कविता : विसावूनी घे रे मना… कवयित्री : कु. गायत्री वसंत आठवले.

विसावूनी घे रे मना…

विसावूनी घे रे मना..नको ओझे अपेक्षांचे..
वचन दे तूच तुला, स्वतः स्वत:ला जपण्याचे…!!

विसावूनी घे रे मना..नको सदा ती स्वप्नमाला..
जगून घे काही क्षण आपुले , नको कसला बोलबाला..!!

विसावूनी घे रे मना..आठवणींची बरसात नको..
नको परके नको आपले , प्रेमाची ती बेडी नको..!!

विसावूनी घे रे मना..नको घेऊ वेध भविष्याचा…
सोड जरा ती दिनचर्या , नको हट्ट संकल्पाचा..!!

विसावूनी घे रे मना..दमलास त्याच विचारांनी..
मुक्त हो काही क्षण , घे मोकळे जगुनी..!!

विसावूनी घे रे मना.. मऊ हलके हो वाऱ्यापरी..
ऊन सावलीचा छंद नको , रम्य हो क्षितिजावरी..!!

विसावूनी घे रे मना..काही क्षण या वळणावरी…
आयुष्य हे सागरासम , स्वैर हो लाटांवरी…!!

……गायत्री

कु. गायत्री वसंत आठवले.
मु.पो.ता. गुहागर
जि.रत्नागिरी,

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *