ac36e8b3-af3f-40c8-b91f-35c6dbfd8e25

अकोले तालुक्यातील कौठवाडीचे ग्रामदैवत बिरोबाचा कठा उत्सव

अकोले तालुक्यातील कौठवाडीचे ग्रामदैवत बिरोबाचा कठा उत्सव 

कठा यात्रा पाहण्यासाठी दरवर्षी होते मोठी गर्दी, बिरोबाची यात्रा अक्षय तृतीये नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी असते.

विलास तुपे : सह्याद्री माझा

अकोले तालुक्याच्या पश्चिमेला आदिवासी भाग चाळीसगाव डांग परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात अनेक दैवते आहेत जगदंबा मंदिर, कळसूबाई मंदिर, हरिश्चंद्र मंदिर, अमृतेश्वराचे मंदिर, अगस्ति मंदिर, घोरपडा देवी मंदिर, कोतुळेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, बिरोबा मंदिर, भैरवनाथ देवस्थान अशी अनेक मंदिरे असून ती भक्तांची श्रद्धास्थाने आहेत. अकोले तालुक्यात भंडारदरा धरण, रतनगड, घाटघर प्रकल्प, रंधा धबधबा, कोदणी प्रकल्प, निळवंडे घरण, असे अनेक पर्यटन स्थळे आहेत. अकोले तालुक्याला प्राचीन परंपरा आहे. यातील कौठवाडी या आदिवासी खेड्यातील बिरोबाच्या यात्रेचे महत्त्व आगळेवेगळे असेच आहे. या ग्रामदैवताचे व यात्रा उत्सवाचे जे वेगळेपण आहे ते बघणे महत्त्वाचे आहे.

बिरोबा हे पूर्ण परिसरातील भाविकांचे कुलदैवत मानले जाते. या देवाची उपासना करतात. या देवाला शिवाचा अवतार मानतात. अकोले तालुक्यातील कौठवाडी या ग्रामदैवताच्या स्थापनेचा एक इतिहास सांगता येतो. या देवाची आख्यायिका पाहता चिलेवाडी (जिल्हा पुणे) या ठिकाणाहून एक आदिवासी महिला गुरे चारण्यासाठी या भागात आली. तिला एका दगडाचा साक्षात्कार झाला. तो दगड़ तिने पाटीत घालून आणला. या दगडाची बिरोबा या नावाने कौठवाडी येथे स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हे जागृत देवस्थान म्हणून अकोले तालुक्यात प्रसिद्ध आहे.

बिरोबाची स्थापना झाल्यानंतर परिसरातले अनेक भक्त दर्शनासाठी कौठवाडीला येऊ लागले. मनातील सुखदुःख देवाला सांगू लागले. लोकांची या देवावरील श्रध्दा वाढू लागली. पूर्वी पासून भोईर आडनावाच्या माणसाकडे देवाच्या पूजेचा मान आहे. आता या मंदिराची पूजा अर्चा भोईर हे करतात. या देवाला वरण भाताचा नैवेदय दिला जातो. पूर्वी भोईर या भक्ताच्या अंगात येत असे. गावचा कठा तेच उचलत असत. आता

बिरोबा देवाला दर रविवारी मक्तगण कौल लावण्यासाठी येतात. कौल लावण्याची वेळ ही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत असते. स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. भक्ताच्या हाताने कौल लावला जातो. आपल्या मनातील इच्छा देवाला बोलून दाखविली जाते. देवाला कौल लावतांनी पूजारी दोन प्रसाद (गोल वर्तुळाकार दगड) देवाच्या उजव्या व डाव्या बाजूला ठेवले जातात. नवस बोललेला नवस पूर्ण होणार असेल तर उजवा प्रसाद खाली येतो. व यात्रेला नवस फेडण्यासाठी कठा अर्पण केला जातो. कौल जर डाव्या बाजूचा खाली आला तर देव नवसाला पावत नाही अशी आख्यायिका आहे.

बिरोबा मंदिराचा परिसर रम्य असा आहे. अनेक डोंगरांनी वेढलेले हे कौठवाडी गाव आहे. गावाच्या माथ्यावर बिरोबाचे भव्य असे मंदिर आहे. बिरोबाचा नऊ एकराचा परिसर आहे या परिसराची देखभाल हरिला विठू भोईर हेच करतात. मंदिरासमोर भव्य असा सभामंडप दिलेला आहे. त्यामुळे उत्सवप्रसंगी भक्तगणांची निवाऱ्याची चांगली सोय झालेली आहे. मंदिरा समोरच गरुडकाठी आहे. काही जुने थडगे बघावयास मिळतात. मंदिरा समोर वरसाचे झाड आहे, त्याला देवाचे झाड असेही म्हणतात. समोरच चार फुट उंचीच्या दोन दिपमाळा आहेत. कठ्याच्या दिवशी त्या पेटवतात. भक्त गणांना या मंदिर परिसरात आल्यानंतर आनंदी न प्रसन्न वाटते. ईश्वराच्या ओढीने आलेला भक्त आनंदी होऊन परतीचा प्रवास करतो.

बिरोबाची यात्रा अक्षय तृतीयाच्या येणारे पहिल्या रविवारी असते. नवस बोलणारे भक्त चन्दा सावण्यासाठी येतात. या दिवशी सर्व भक्त उपवास धरतात. यात्रेत पूर्वी बिरोबाचा पहिला कठा उचलण्याचा मान भोईरांचाच होता. आता कालपरत्वे त्यात बदल झालेला बघावयास मिळतो. कठा म्हणजे मडके याला भदी असेही म्हणतात. ही भदी पाठीमागून कापतात. सुतार समाजातील कारागीर ही भदी कापून व त्याचा देवाचा कठा बनवून देतात. दीन्याच्या धाग्याने त्याला विणून घेतात. सामत्याने त्याला छित्र पाडले जातात. कापलेल्या भदीचा टुकडा आत ठेवला जातो. भदी उलटी करून त्यात खैर व सागाची लाकडे टाकली जातात. पूजाऱ्याच्या हाताने त्यात कापूर, सरकी, लिंबू, गोमुत्र, सुपारी, हाळद, कुंकू ठेवले जाते. कठयासाठी नवस बोलणारे लोक पाच किलो तेल कठ्यासाठी देतात. दुपारी बारा वाजता कठे कापण्यास सुरूवात होते. ते संध्याकाठी आठ वाजेपर्यंत कठयाची तयारी चालते. ती सदी पेटवली की त्याला कठा असे म्हणतात. पूर्वी चिलवडीहून यात्रेच्या दिवशी बिरोबाची काठी येत असे. आता साकिरवाडीहून भांगरेची काठी येते. रात्री सात वाजता काठी येते. काठी आल्यावर देवाला परशी (देवाला भेटणे) लावतात. कठा पेटवण्या आधी परातीत ठेवतात. यानंतर कठे पेटवले जातात. गावकीचा एकच कठा असतो. कठा ठेवण्यासाठी नव्या टॉवेलाची चुबळ करतात. भक्ताच्या अंगात आल्यावर एक एक भक्त कठा उचलतो. नवस बोलणारा कठ्याच्या मागे चालतो. ज्याने कठा उचललेला आहे, त्याच्या अंगावर उकळलेले तेल पडत असते. त्याला पुसण्याचे काम नवस बोलणारा करत असतो.

दरवर्षी 70 ते 80 कठे उचलले जातात. एक फेरी पंधरा मिनिटाची असते. रात्री बारा वाजेपर्यंत कठयाला मिरविले जाते. भक्ताने कठा उचलल्यावर तेल टाकण्यासाठी भक्त खुटामेटावर बसतो व तेल टाकण्याचे काम नवस बोलणारा करतो. फेऱ्या मारल्यानंतर दीप माळेजवळ कठे उतरवले जातात. रात्री बारा नंतर यात्रेकरू व गावकऱ्यांसाठी मनोरंजन म्हणून तमाशाचा कार्यक्रम असतो.

अकोले तालुक्यात अनेक देवस्थाने आहेत. त्यांचाही अभ्यास करावयाचा आहे. कौठवाडीच्या यात्रेला विशेष असे महत्त्व आहे. पुणे, मुंबई, नाशिक, अशा दूरवरून यात्रेच्या वेळी भक्त येतात. आनंदाने आपला नवस फेडतात. दोन-दोन दिवस या यात्रेसाठी भक्तगण गावात पाहुणे म्हणून येतात. यात्रेच्या काळात गावात उत्सवाचे वातावरण असते. कठा बघण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. रात्रीच्या अंधारात कठयाचे दृश्य विलोभनिय असते. गावात दिवशी सर्व पाहुण्यांना आनंदाने जेवण दिले जाते. अशी ही बिरोबाची यात्रा स्मरणात राहिल अशीच असते.    (सर्व छायाचित्र संग्रहित आहेत)
शब्दांकन…

विलास तुपे
वृत्तपत्र छायाचित्रकार
राजूर- 9860167546

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *