विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव पारदर्शकपणे साजरा करा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सेल्फी
अहिल्यानगर दि. २७- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव पारदर्शकपणे साजरा करावा. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना आनंद देणारे वातावरण निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
शहरातील नंदनवन लॉन्स येथे मतदान कामकाज संबंधी प्रशिक्षण आणि भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे मतदान यंत्र हाताळणीबाबतच्या प्रशिक्षण सत्राला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर तहसीलदार स्वप्निल ढवळे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, सुधीर उबाळे, अनिल तोरडमल उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीचे काम अत्यंत पारदर्शी व बिनचूकपणे होण्यावर भर देण्यात येतो. निवडणुकीच्या कामातील चुका टाळण्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण अत्यंत बारकाईने घेऊन निवडणूक प्रक्रिया बिनचूक व गतिमान होईल यासाठी प्रयत्न करावे. मतदान प्रक्रियेला भंग करणारी कृती होणार नाही याची दक्षता घेतांना सर्वांनी एकसंघपणे काम करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतू मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराला आनंददायी वातावरणाची अनुभूती येऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठीही प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. मतदानासाठी मोठी रांग असेल तर बाजूच्या खोलीमध्ये मतदारांसाठी आसन व्यवस्था तयार करावी. मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच गरोदर महिलांना रांगेमध्ये उभे न करता त्यांना मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली पाहिजे. मतदारांना मतदान केंद्रावर आनंददायी वातावरणासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने अधिक प्रमाणात प्रयत्न करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी केले.
मतदानाची कार्यपद्धती सांगून निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील म्हणाले, सर्वसमावेशक आणि सर्वांना सोयीची होईल अशी निवडणूक घेण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मतदान हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया, माहिती पुस्तिका यांचे अवलोकन करून कामकाज करावे. मतदान प्रक्रिया राबविताना काही अडचणी असल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान यंत्र व कार्यपद्धतीबाबत आयोजित प्रशिक्षण मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिवसभरातील दोन सत्रात २ हजार ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २ हजार ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सेल्फी
नंदनवन लॉन्स परिसरामध्ये स्वीप समितीमार्फत मतदान जनजागृतीबाबत सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली होती. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सेल्फी घेत मतदारांनामध्ये मतदानाची अधिकाधिक जागृती करण्याचा संदेश दिला. त्यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ दिली.
जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण सत्रांना जिल्हाधिकाऱ्यांचे चित्रफीतीद्वारे मार्गदर्शन
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघात निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
नाविन्यपूर्ण संकल्पनेतून मतदान यंत्र व कार्यपद्धतीबाबत चित्रफीत तयार करण्यात आली आहे. या चित्रफीतीत मतदान केंद्राची रचना, केंद्रावर आवश्यक साहित्याची मोजणी, मतदान केंद्राची मांडणी, मतदानाच्या आधीच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी घ्यावयाची काळजी, मतदान प्रक्रियेदरम्यान भरावयाचे फॉर्म्स, अहवाल, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान यंत्र जमा करणे यासह चित्रफीतीत प्रदर्शित विविध माहितीचा कर्मचाऱ्यांनी उपयोग करावा, असे आवाहन आपल्या संदेशाद्वारे त्यांनी केले.
निवडणूक प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रक्रियेची माहिती करून घ्यावी. निवडणुकीचे कामकाज आणि मतदान यंत्राविषयी असलेल्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करून घ्यावे. कामाचा ताण न घेता निवडणुकीचे कामकाज आनंददायी वातावरणात आणि परस्पर सहकार्याने पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी केले आहे.
Add a Comment