अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची कोंभाळणे येथील बीज बँकेला भेट
बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्याशी साधला संवाद
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
अकोले : गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचे कोंभाळणे येथील बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या माध्यमाने उभारल्या गेलेल्या देशातील पहिल्या ग्रामीण भागातील बीज बँकेला अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी नुकतीच भेट दिली. राहीबाई यांना आपण नक्की बीज बँकेला भेट देण्यास येऊ असे आश्वासन त्यांनी या अगोदर दिले होते. त्यानुसार बीज बँकेला भेट देऊन त्यांनी तेथे सुरू असलेले उपक्रम समजावून घेतले.
स्थानिक वाणांचे संवर्धन व वृद्धि यासंदर्भातील सुरू असलेल्या कामांची माहिती त्याने राहीबाई यांच्याकडून समजून घेतली. बीज बँकेत डिस्प्ले केलेली फोटो व अवॉर्ड गॅलरी बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर महत्वाच्या व्यक्तीं सोबत असलेले फोटो बघून त्यांनी आपण यांच्या सोबत पुरस्कार घेतल्यानंतर संवाद साधला का असा प्रश्न केला. त्यावर राहीबाई यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या सोबत मराठीत झालेला संवाद व आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण भागातील प्रमुख समस्या वीज , रस्ते व पाणी यांच्यावर लक्ष घालण्याची विनंती राहीबाई यांनी जिल्हाधिकारी यांना यावेळी केली.
जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांना आदिवासी भागात उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या किती उग्र होत असते हे प्रत्यक्ष अनुभवायला भेटले . टॉयलेट आहे परंतु पाणी नाही हे चित्र साहेबांनी स्वतः राहीबाई यांच्याकडे अनुभवले. जिल्हा परिषदेची पोपेरे वाडी येथील मराठी शाळा सध्या दुरुस्त करण्याचे काम अग्निपंख या स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्यासाठी नक्की या असे निमंत्रण राहीबाई यांनी भोसले साहेबांना दिले. या छोटेखानी दौर्यात राहीबाई यांच्याशी मुक्त संवाद साधतांना त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी जाणून घेतले. यापुढे स्थानिक बियाणे संवर्धनासाठी राहीबाई यांचे असलेले लक्ष समजावून घेतले. या भेटीदरम्यान संगमनेरचे प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे, सर्कल बाबासाहेब दातखिळे, तलाठी खेमनर, राहीबाई यांचे पती सोमा पोपेरे हेही उपस्थित होते.
Add a Comment