आबिटखिंड येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा
कोतूळ : आबिटखिंड (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा तयारी अभियान अंतर्गत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. नियोजनाप्रमाणे या मुलांचे विकास पत्र भरुन घेण्यात आले. गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख रामनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जांभळेवाडी केंद्रात शाळा पूर्वतयारी मेळावे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे यांनी दिली.
विकास पत्रातील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी व शिक्षक यांनी यावेळी कृतियुक्त गित सादर केले त्यात पालकांनीही उस्फुर्त सहभाग नोंदवला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रवेशपात्र शंभर टक्के मुलांचे प्रवेश यावेळी झाले. पुढील शैक्षणिक वर्षाची वातावरण निर्मीती आताच केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी सरपंच भानुदास गोडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मनिषा गोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य किसन गोडे, सेवानिवृत्त पोलीस किसन घनकुटे, शिक्षक सोमनाथ मुठे, अंगणवाडी सेविका सुलाबाई गंभिरे, कैलास राऊत, डाॅ. रोशन घनकुटे, विश्वनाथ घनकुटे, सोमनाथ तिटकरे, अनिल भोजने, सोपान भांडकोळी, कल्पना घनकुटे, जिजाबाई तिटकरे, मिनानाथ घनकुटे, दिलीप भारमल, संगिता घनकुटे, बबन शिंदे, ऋषि शिंदे यांच्यासह पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे यांनी केले. आभार कैलास राऊत यांनी मानले. ता. १२.४.२०२२
Add a Comment